April 18, 2025

सप्तशृंगी गडावरील यात्रेनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी धुळे विभागातून सुटणार दर अर्ध्या तासाला एसटी बस

0
images

धुळे- उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवासानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातून यंदाच्या वर्षीही प्रत्येक आगारातून जादा बसेससह दर अर्ध्या तासाला एसटी बस प्रवाश्यांच्या सेवेसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आई सप्तशृंगी देवीची चैत्र महिन्यात यात्रा भरत असते. यावर्षी यात्रोत्सवास शनिवार दि. ०५ एप्रिल पासून सुरूवात होत आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून सप्तशृंगी गड येथे दर्शनासाठी मोठया प्रमाणात काही भाविक पायी तर काही भाविक एसटी महामंडळाच्या बसेसने जात असतात. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील धुळे,साक्री,शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर आगारांमधून जादा बसेससह भाविकांची संख्या लक्षात घेता दर अर्ध्या तासाला सप्तशृंगी गडासाठी बसेस सोडण्यात येणार आहे.

सप्तशृंगी गडावर तात्पुरत्या बसस्थानकाची सोय
वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांचे दर्शन झाल्यावर परतणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकासांठी स्वतंत्र एक तात्पुरत्या बसस्थानकाची सोय करण्यात आलेली आहे. या तात्पुरत्या बसस्थानकावरून धुळे, साक्री, नंदुरबार, शिरपूर, शहादा, शिंदखेडा, अक्कलकुवा, दोंडाईचा व नवापूरसाठी बसेस उपलब्ध होणार असून त्यामुळे भाविकांचा परतीचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.

धुळे विभागातील अधिकारी-कर्मचारी असतील भाविकांच्या मदतीला
सप्तशृंगी गडावर यात्रा कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी व मार्गदर्शनासाठी धुळे विभागातील विविध आगारांचे सुमारे ३५ ते ४० पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी दिवसा व रात्र पाळीत २४ तास प्रवाश्यांच्या मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.

उत्पन्न वाढीसाठी आगारांना देण्यात आले उद्दिष्ट
सप्तशृंगी गडावरील यात्रेतून धुळे विभागातील विविध आगारांच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी प्रत्येक आगाराला ठराविक उद्दीष्ट देण्यात आले असून त्यापेक्षा जास्त उत्पन्न आणण्याचे आवाहन विभाग नियंत्रक विजय गिते, यंत्र अभियंता पंकज महाजन यांच्यावतीने आगारातील आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकीय अधिकारी-कर्मचारी यांना करण्यात आले आहे.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जादा बसेसची व्यवस्था
शनिवार दि. १२ एप्रिल रोजी पहाटे ०३ वाजून २१ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होणार असून रविवार दि.१३ एप्रिल रोजी पहाटे ५.५१ वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात जादा बसेसच्या व्यवस्थेचे नियोजन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भाविकांच्या सेवेसाठी सप्तशृंगी गडावर होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून जादा बसेससह दर अर्ध्या तासाला बसेसची व्यवस्था एस.टी. महामंडळातर्फे करण्यात आली आहे. तसेच सप्तश्रृंगी गडावर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांसाठी तात्पुरते बसस्थानक करण्यात आले असून याठिकानावरुण परतीच्या प्रवासासाठी २४ तास बसेसची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने एस.टी. महामंडळाच्या बसनेच प्रवास करून रा.प. महामंडळाला सेवेची संधी द्यावी.
सौरभ राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *