ठाणेपाडा गाव दारूमुक्त करण्यासाठी महिलांचा लढा

आष्टे (नंदुरबार) – नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावात दारू, जुगार आणि सट्टाविरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेत व्यसनमुक्त गावासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील महिला, तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन रॅली काढली, घोषणा देत हातात बॅनर घेऊन दारूबंदीचा निर्धार व्यक्त केला.
ठाणेपाडा हे आदिवासी बहुल गाव असून येथे कोकणी आणि भिल समाजाची वस्ती आहे. काही वर्षांपूर्वी गावात दारूबंदी होती, मात्र नंतर दारू विक्री वाढल्याने विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली. यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले, अनेकांना प्राण गमवावा लागला आणि घरगुती वादविवाद वाढले. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी गावातील प्रमुख मंडळी, महिला आणि तरुणांनी एकत्र येत गावात तसेच शेतशिवारात दारू बनवणे, बाहेरून विकत आणणे किंवा विक्री करणे तसेच जुगार आणि सट्टा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.
गावात दारूबंदीच्या निर्णयाला बळ देण्यासाठी ८ एप्रिल २०२५ रोजी व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्यसनमुक्तीचे प्रणेते शेषराव महाराज यांचे सुपुत्र संतोष महाराज मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले बारीपाडा गावाचे शिल्पकार वनमित्र चैत्राम पवार यांचा नागरी सत्कार आणि सामूहिक वन हक्क संदर्भातील विशेष मार्गदर्शनही होणार आहे.
गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दारूबंदीच्या या निर्णयामुळे गावाचे सामाजिक वातावरण सुधारेल, अशी आशा व्यक्त होत आहे.