धुळ्यात तरुणांकडून 25 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त…

धुळे – धुळ्यात नागपूर सुरत महामार्गावरील एका हॉटेल जवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या तरुणाच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून धुळे जिल्ह्यातून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आता निर्माण झाला आहे….
नागपूर सुरत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणांकडे बनावट नोटा असून त्याच्या हालचाली संशयित असल्याची माहिती आझाद नगर पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दिली. त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने हालचाली करीत या हॉटेल जवळून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवासी असून त्याचे नाव दिलीप पावरा असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 500 रुपये तसेच दोनशे रुपये किमतीच्या सुमारे 25 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात आता आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नोटांची तस्करी करणारा या युवकाने नेमक्या या बनावट नोटा कुणाकडून घेतल्या होत्या, आणि महामार्गावरून तो या बनावट नोटा कुणाला देणार होता, याविषयीचा तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी यावेळी दिली….