धुळे: जिल्हा क्रीडा संकुलन येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बक्षीस प्राप्त खेळाडूंना धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र ऊर्फ रामदादा भदाणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
शिक्षण विभाग पंचायत समिती, धुळे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट प्राविण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
बक्षीस वितरणाच्या प्रसंगी आमदार राघवेंद्र भदाणे यांनी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, “मैदानी खेळांमध्ये केवळ शारीरिक विकासच नाही, तर मानसिक विकासही होतो. विजयी खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो, तर पराजयामुळे खेळाडूच्या जिद्देत वाढ होते आणि तो अधिक मेहनत करतो. बक्षीस न मिळाल्यास निराश होऊ नका, कष्ट करा, विजय नक्की मिळेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची आणि देशाचे नेतृत्व करण्याची संधी मैदानी खेळ प्रदान करतात.”
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपाचे प्रा. अरविंद जाधव, माजी पंचायत समिती उपसभापती विद्याधर पाटील, तसेच क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि पुढील स्पर्धांसाठी त्यांना प्रेरणा मिळाली.