December 23, 2024

दसऱ्याला आपट्याचीचं पाने सोनं म्हणून का देतात?

शारदीय नवरात्री समाप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दसऱ्याचा (Dasara 2024) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, याला विजयादशमी असं म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो हा मुहूर्त. भारतीय संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. रामाने या दिवशी रावणाचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केली जाते. आपट्याची पानं दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वाटली जातात.

दसऱ्याच्या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी, पेन पुस्तक, सरस्वती देवी ,आपल्याला महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी, आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं. मात्र, या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का दिली जातात? हे जाणून घेऊया.

‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’

सर्व लोक दसऱ्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानांची एक पौराणिक गोष्ट आहे. रघुकुलामधील श्रीराम चंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती, पण त्यांनी ती दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता. जेव्हा हे राजे अरण्यात राहत त्यानंतर त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी येथे आले. त्या राजांकडे त्यांनी १४ कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. वास्तविक, तेव्हा ते राजे वानप्रस्थाश्रमाला निघाले त्यावेळी त्यांच्याकडे धन नव्हते. तरीही गुरुंची मागणी परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले. मात्र या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी तुमचं राज्य मला नको, मला १४ कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली. तेव्हा इंद्रदेव म्हणाले पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे इंद्रदेवांनी सांगितले. त्याप्रमाणे आपट्याच्या पानांच्या रूपाने इंद्रदेवांनी सोन्याचा वर्षाव केला. आणि म्हणूनच आपट्याची पानं आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात आणि ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असं गोडं वाक्य एकमेकांना शुभेछया देताना म्हणतात.