रांझणी येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन
तळोदा – तळोदा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या रांझणी येथील विठ्ठलरुक्माई मंदिरात दि. 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 पासून रोज रात्री 8 ते 11 दरम्यान शिवकथा होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दि.6 बुधवार रोजी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होत असून दररोज पहाटे काकडा आरती, भूपाळी व सायंकाळी पाच वाजता हरिपाठ दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत शिवमहापुराण कथा होणार आहे. दि. 13 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेदरम्यान काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. त्याचबरोबर दि. 12 मंगळवार रोजी शिवमहापुराण कथा दिवसा 2 ते 5 या वेळेत होणार आहे. विठ्ठल मंदिर प्रांगणात शिवपुराण कथेचे निरूपण भागवताचार्य हभप वामन महाराज लामकानीकर धुळे हे करणार असून दिनांक 12 रोजी एकादशीनिमित्त रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध भारुडकार हभप गोविंद महाराज गायकवाड आळंदीकर यांचा विनोदी भारुडांचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी एकादशीच्या महापूजा मान संजयराव भटुजी जगताप व सौ ज्योती संजयराव जगताप (कुकरमुंडा) यांना देण्यात आला आहे तर शिवमहापुराण कथा आरतीचा मान राजेंद्र सुपडू बोराणे व ललित राजेंद्र बोराणे(रांझणी) यांना देण्यात आला आहे तर रोजची आरती पुजारी दिलीप गणपत जाधव व वैशाली गणपत जाधव यांच्या हस्ते होणार आहे. कार्तिकीनिमित्त श्रीहरीची पालखी मिरवणूक निघणार असून आत्माराम भजनी मंडळचे सहकार्य लाभणार आहे. तसेच दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री श्रीहरी जागरणासाठी रात्री अकरा ते दोन या वेळेत नादब्रह्म ग्रुप शहादा यांचा शास्त्रीय भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मंडप राकेश भापकर, साऊंड सिस्टिम क.मोहिदा तर किचन साहित्यासाठी सागर गोसावी यांचे सहकार्य लाभणार असून या अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रांझणी ग्रामस्थ मंडळी, विठ्ठल रुक्माई सेवा समिती,नवयुवक मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.