December 23, 2024

निवडणूक विषयक पत्रक, छापील साहित्यावर प्रकाशकासह मुद्रकाचे नाव आवश्यक, अन्यथा सहा महिन्यांपर्यत होणार कारावास

जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती 

धुळे (जिमाका वृत्त) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल, असे कोणतेही साहित्य मुद्रित व प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्यावर प्रकाशक, मुद्रकाचे नावे असणे आवश्यक आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके इ. मुद्रणांचे सनियंत्रणासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व मुद्रणालये यांचे लक्ष लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या आवश्यकताकडे वेधण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल, असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्यावर प्रकाशक आणि मुद्रकाचे नाव असणे आवश्यक आहे.

निवडणूकीसाठी असणारी पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वत:च त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वत: स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणा-या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. यानुसार दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणा-या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावयाची आहे. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचे लायसन्स रद्द करणेसह कठोर कारवाई करण्यात येईल.

निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रीत पत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणा फलक किंवा भित्तीफलक असा होतो. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल, इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालकांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करुन धुळे जिल्ह्यातील सर्व प्रकाशक आणि मुद्रकांनी निवडणुकीशी संबंधित साहित्य प्रकाशित करताना याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पापळकर यांनी कळविले आहे.

About The Author