December 23, 2024

साक्री विधानसभा मतदार संघात 8 व 9 नोव्हेंबरला होणार गृहमतदान; 438 वृद्ध, दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

धुळे (जिमाका वृत्त) – विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील, अंथरुणाला खिळलेले व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार 05-साक्री विधानसभा मतदार संघात 438 मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहे. या मतदारांसाठी 8 व 9 नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार आहे. अशी माहिती साक्री विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली आहे.

 याकरीता साक्री विधानसभा मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या 438 एवढी आहे. यात 85 वर्षावरील 348 मतदार असून 90 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व वृद्ध मतदारांच्या घरी जावून मतदान घेतले जाणार आहे. यासाठी साक्री विधानसभा मतदार संघात 8 व 9 नोव्हेंबरला सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात येईल. तर या तारखेस अनुपस्थित असलेल्या मतदारांसाठी 10 नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहेत. त्यासाठी 14 पथके तयार करण्यात आली असून यापैकी 3 पथके राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक स्क्षूम निरिक्षक तर एक व्हीडीओग्राफर अशी 5 कर्मचाऱ्यांची टीम असणार आहे.

 तरी साक्री विधानसभा मतदार संघातील ज्या 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा. तसेच यादिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना मतदानाची संधी नसेल. असेही निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक अधिकारी साहेबराव सोनवणे यांनी कळविले आहे.

About The Author