विरोधकांच्या छातीत पुन्हा कळ निघेल एवढे मताधिक्य द्या – राम भदाणे
भाजप महायुतीचा नगावला निर्धार मेळावा
धुळे – तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार (कै.) अण्णासाहेब द. वा. पाटील यांच्यानंतर आमच्या कुटुंबाला गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. धुळे ग्रामीणमधील भाजपचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता गेल्या १४ वर्षांपासून भाजपचा आमदार निवडून यावा म्हणून लढा देत आहे. हा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपविण्यासाठी आता तुमच्या लाडक्या रामला आमदारपदी विराजमान करा, असे भावनिक आवाहन करतानाच विरोधकांच्या छातीत पुन्हा एकदा कळ निघेल, एवढे मताधिक्य द्या, असे प्रतिपादन धुळे ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष- महायुतीचे उमेदवार राम ऊर्फ राघवेंद्र मनोहर भदाणे यांनी केले.
श्री. भदाणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासह त्यांच्या विजयासाठीचा निर्धार मेळावा रविवारी (ता. २७) नगाव येथील गंगामाई शैक्षणिक संकुलाच्या आवारात झाला, त्यावेळी श्री. भदाणे बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस किशोर सिंघवी, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, किशोर हालोर, ज्ञानेश्वर चौधरी, भाजपचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. विजय पाटील, धुळ्याचे माजी नगरसेवक नरेश चौधरी, दादाजी पाटील, रंगनाथ ठाकरे, वंदना भामरे, अजय माळी, प्रवीण पवार, श्रीराम पाटील, दिनेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्याला तालुक्याच्या विविध गावांतील भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या बळावरच उमेदवारी : भदाणे
श्री. भदाणे म्हणाले, की कुटुंबात राजकारणाचा मोठा वारसा असतानाही मी वयाच्या १८ व्या वर्षापासून सामाजिक कार्याला प्रारंभ केला. तेव्हापासून धुळे तालुक्यातील गावागावांत, वाड्या-पाड्यांवर भारतीय जनता पक्षाशी जनतेला जोडण्याचे काम सुरू केले. पक्षाची ध्येयधोरणे, केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याच कामाची पावती म्हणून पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, नेते तथा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राज्यातील सर्वाधिक तरुण उमेदवार म्हणून मला धुळे ग्रामीणमधून भाजपची उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी केवळ तालुक्यातील जनतेच्या बळाच्या जोरावर मिळाली आहे. आता मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे निघणाऱ्या रॅलीत सहभागी व्हावे. जेणेकरून विरोधकांच्या छातीत पुन्हा एकदा कळ निघाली पाहिजे, एवढ्या मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करा.
विरोधकांच्या छातीत पुन्हा कळ आणा : भदाणे
श्री. भदाणे म्हणाले, की भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता गेल्या १४ वर्षांपासून भाजपचा आमदार व्हावा म्हणून लढा देतोय. हा १४ वर्षांचा वनवास संपवून आता तुमच्या लाडक्या रामला आमदारपदी विराजमान करा. यासाठी भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. विरोधकांनी आतापर्यंत दाखविलेली सत्तेची आणि पैशांची मस्ती जिरवायची आहे. तालुक्यातील पक्षाच्या सर्व नेत्यांनी मला आज आशीर्वाद दिला आहे. आता वेळ जनतेची आहे. जनतेनेही आता मोठ्या संख्येने मतदान करून मला आशीर्वाद द्यावा. आजोबा माजी आमदार (कै.) अण्णासाहेब द. वा. पाटील यांनी २० वर्षे आमदार म्हणून जिल्ह्याच्या, तालुक्याच्या राजकारणात छाप सोडली. मात्र, त्यानंतर आम्हाला सातत्याने पराभव स्वीकारावा लागला. या काळात पुन्हा जनतेत मिसळून पक्षाची ध्येयधोरणे, शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम केले. सुख-दुःखात जनतेच्या पाठीशी राहिलो. त्यांची कामे केली. उलट सत्ताधाऱ्यांनी तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले. तालुक्यातील सहकारी संस्था चाटून-पुसून खाल्ल्या. जवाहर सूतगिरणीच्या तीन हजार कामगारांसह त्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडून दिले. मात्र, मी येत्या काळात तुमचा एक-एक पैसा विरोधकांच्या घशातून काढून आणीन. तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांच्या विकासासाठी झटायचे आहे. शेतीचा शाश्वत विकास करायचा आहे. तालुक्यात उद्योगधंदे आणायचे आहेत. सर्वांगीण विकास साधायचा आहे. तालुक्यातील गावागावांत जोडलेल्या कार्यकर्त्यांमुळे यावेळी सर्व ३८८ बूथवर भाजपचा उमेदवार म्हणून पहिल्या पसंतीची मते मिळतील, असा विश्वासही श्री. भदाणे यांनी व्यक्त केला.
मी रामबरोबरच : सुभाषदादा देवरे
सुभाष देवरे म्हणाले, की धुळे ग्रामीणमधून भाजपचे उमेदवार म्हणून राम भदाणे यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायचे आहेत. मी रामबरोबरच आहे आणि यापुढेही राहणार. याबाबत कुठलीही शंका घेऊ नका. आपल्या सर्वांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही श्री. देवरे यांनी केले.
राम भदाणेंना मेरिटवर उमेदवारी : शर्मा
संजय शर्मा म्हणाले, की भाजपच्या प्रत्येक सभेत उपस्थितांची गर्दी दिसते. मात्र, या गर्दीचे रूपांतर विजयात होत नाही. भदाणे कुटुंबाला गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांत फार थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. आता मात्र तसे होऊ देऊ नका. राम भदाणे यांना त्यांच्या मेरिटवर उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मी त्यांना वचन दिले आहे, की इमाने-इतबारे तुमचेच काम करीन. आता येथे उपस्थित प्रत्येकाने शपथ घ्या, की राम भदाणेंना विजयी करायचे आहे. त्यांच्या कुटुंबाला उज्ज्वल राजकीय वारसा आहे. माजी आमदार अण्णासाहेब द. वा. पाटील यांचा आशीर्वाद आहे. तालुक्यात भ्रष्टाचाराचा नुसता चिखल झाला आहे. हा चिखल दूर करत आता राम भदाणेंना विजयी करून कमळ फुलवा. त्यांना किमान २५ हजारांचे मताधिक्य मिळवून द्या. आपापसांतील मतभेद, हेवेदावे विसरून सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने भाजपचा भगवा फडकविण्यासाठी आगामी २० दिवस मेहनत घ्या.
बबनराव चौधरी म्हणाले, की पक्षाने राम भदाणे या सर्वांत तरुण उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारीची संधी दिली आहे. त्यांच्या विजयातून इतिहास घडविण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व करण्याचे कर्तृत्व आहे. पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी श्री. भदाणे यांच्या विजयासाठी झटतील. त्यांना एक लाखाचे लीड देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, तन-मन- धनाने काम करूया, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले.
राम भदाणे बनणार राज्यातील सर्वांत तरुण आमदार : डॉ. भामरे
माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब द. वा. पाटील यांचा समृद्ध राजकीय वारसा चालविण्याची धमक राम भदाणे यांच्यात आहे. त्यांनी गेल्या १०-१५ वर्षांत तालुक्यातील जनतेशी नाळ जोडत प्रचंड काम उभारले आहे. यातून त्यांच्या पाठीशी तालुक्यातील जनतेचे बळ उभे राहिले आहे. प्रत्येक वयोगटातील कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी आहे. तालुक्यात काही वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सत्ता राहिल्याने कुठलाच विकास झाला नाही. कुठला नवा प्रकल्प झाला नाही. होत्या त्या सहकारी संस्था रसातळाला गेल्या. यामुळे यावेळची निवडणूक तालुक्याची दशा आणि दिशा ठरविणारी असून, भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राम भदाणे यांच्या पाठीशी राहा आणि त्यांच्या विजयासाठी रात्रंदिवस एक करा, असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले.