सोडा गाडी विक्रेत्यांकडून 4 हजारांची लाच घेतांना हवालदार एजाज शेख एसीबीच्या जाळ्यात
धुळे : ओमनी गाडीवर सोडा विक्री करणार्या तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारतांना देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एजाझ काझी (52) रा. पोलीस मुख्यालय धुळे, यांना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून देवपूर पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.
यासंदर्भात, 50 वर्षीय तकारदार यांचा देवपूर पोलीस ठाणे हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे हवालदार एजाझ काझी यांनी तक्रारदार यांच्याकडे 4 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून एजाझ काझी यांच्याविरुध्द तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी नाशिकचे एसीबीचे पथक धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्यात आले असता एजाझ काझी यांनी त्यांच्यासमोरच तक्रारदार यांच्याकडे 4 हजार रुपये लाचेची मागणी केली व ही लाच स्वीकारतांना त्यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. नाशिक एसीबीचे पथक गुलमोहर शासकीय विश्रामगृहात तक्रारदार यांची फिर्याद घेवून पंचनाम्याचे सोपस्कार करीत होते.
ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रच्या पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे – वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे.